विद्यापीठाचे दुबई केंद्र बंद होणार? Print

प्रतिनिधी
एकिकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पुणे विद्यापीठाचे परदेशातील एकुलते एक असलेले दुबई येथील केंद्रही बंद होणार असल्याची चर्चा सध्या विद्यापीठात आहे. पुणे विद्यापीठाकडे मध्य आशियामधील विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी दुबई येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू केले होते. मात्र, सुरुवातीपासूनच या केंद्राला विविध अडचणींचे ग्रहण लागले होते. नुकतीच विद्यापीठाच्या समितीने या केंद्राची पाहणी केली. त्यानंतर आता दुबई येथील केंद्र बंद करण्यात येणार असल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
अंदमान येथील महाविद्यालयांना संलग्नता देण्यासाठीही आता विद्यापीठाला पुढील वर्षीचा मुहूर्त पहावा लागणार आहे. अंदमान येथील महाविद्यालयांना पुणे विद्यापीठाची मान्यता मिळावी असा प्रस्ताव तेथील सरकारने पुणे विद्यापीठापुढे ठेवला होता. पुढील शैक्षणिक वर्षांपासून संलग्नता मिळण्यासाठीचे प्रस्ताव बुधवापर्यंत (३१ ऑक्टोबर) स्वीकारण्यात येणार होते. मात्र, तो पर्यंत अंदमानमधील महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विद्यापीठाकडून निर्णय न झाल्यामुळे आता याबाबत पुढील वर्षीच कार्यवाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.