पांढऱ्या सोन्याला पर्याय म्हणून ग्राहकांची प्लॅटिनमला पसंती Print

प्रतिनिधी
दागिने घ्यायचे तर सोन्याचेच असे म्हणणाऱ्या ग्राहकांची पावले आता सोन्याकडून प्लॅटिनमकडे वळू लागली आहेत. किमतीत सोन्याच्या तोडीस तोड असणारे प्लॅटिनम दिसायला चांदीच्या जवळचे असल्यामुळे प्लॅटिनमचे दागिने खरेदी करायला सामान्य ग्राहक कचरत असत. मात्र गेल्या काही वर्षांत सोन्यातही विविध रंगांचा ट्रेंड रुजल्यावर, व्हाईट गोल्ड अर्थात पांढऱ्या सोन्याला पर्याय म्हणून ग्राहक प्लॅटिनमला पसंती देत आहेत.
रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तुपाल रांका यांनी ही माहिती दिली. रांका ज्वेलर्समध्येबुधवारी अभिनेता राम कपूर आणि पत्नी गौतमी कपूर यांच्या हस्ते प्लॅटिनम दागिन्यांची नवी श्रेणी सादर करण्यात आली. ‘प्लॅटिनम गिल्ड’चे व्यापार व्यवस्थापक राहिल माहिमतुले, रांका ज्वेलर्सचे तेजपाल रांका, शैलेश रांका या वेळी उपस्थित होते.
वास्तुपाल रांका म्हणाले, ‘‘सोन्याच्या आणि प्लॅटिनमच्या भावात फारसा फरक नसल्याने पांढऱ्या सोन्याला पर्याय म्हणून ग्राहक प्लॅटिनमचे दागिने खरेदी करणे पसंत करतात. पांढरे सोने कालांतराने पिवळे पडू शकते. सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनम जितके दुर्मिळ असते तितकेच टिकाऊही असते. यामुळे ग्राहकांची विशेषत: तरुणवर्गाची प्लॅटिनमला वाढती पसंती आहे.’’ माहिमतुले यांनी सांगितले, की ‘‘प्लॅटिनम दागिन्यांच्या एकूण विक्रीत साठ टक्के वाटा ‘प्लॅटिनम लव्ह बँड्स’ अर्थात दाम्पत्यांसाठीच्या एकाच प्रकारच्या अंगठय़ांचा आहे. या अंगठय़ा जोडीमध्ये तसेच वेगवेगळय़ाही विक्रीस उपलब्ध आहेत. प्लॅटिनमची घनता सोन्यापेक्षा अधिक असते. हा धातू हिऱ्याला चांगल्या प्रकारे धरून ठेवू शकतो. त्यामुळे प्लॅटिनममध्ये हिरे बसवून घडविलेल्या दागिन्यांनाही ग्राहकांची चांगली मागणी आहे. पूर्वी केवळ भरपूर कमावणारा ग्राहकवर्ग प्लॅटिनमच्या दागिन्यांसाठी विचारणा करीत असे. आता या वर्गाबरोबर सामान्य गृहिणीही हे दागिने खरेदी करण्यास उत्सुक दिसतात. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच प्लॅटिनमलाही पुनर्विक्री किंमत असते. तसेच प्लॅटिनमच्या सर्व विक्रेत्यांकडे या दागिन्यांवर ‘बाय बॅक’ योजनाही उपलब्ध आहे.