अजितदादांचे दुर्लक्ष की नियंत्रण सुटले? Print

पालिकेचे कामकाज थंडावले, पक्षसंघटनेत विस्कळीतपणा
बाळासाहेब जवळकर
नांदेड गाजवलेले डॉ. श्रीकर परदेशी िपपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी येताच त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली, पण वेगाने कामे होऊ लागताच त्यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले. तेव्हापासून कामकाज एकदम थंडावले आणि पूर्वीप्रमाणेच कारभार दिसू लागला आहे. राजकीयदृष्टय़ा ‘सबकुछ’ असलेल्या राष्ट्रवादीतही प्रचंड विस्कळीतपणा आहे.. त्यामुळे अजित पवार यांनी शहराकडे लक्ष न देण्याची भूमिका घेतली की त्यांचे नियंत्रण राहिले नाही, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
िपपरी-चिंचवडच्या कायापालटाची सुरुवात करणाऱ्या आयुक्त दिलीप बंड यांच्या जोरदार ‘इनिंग’ नंतर आशिष शर्मा आयुक्त झाले. त्यांनी मोठे प्रकल्प राबवण्याऐवजी सुरू असलेली कामे पूर्ण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या काळात कामे थंडावल्याचा आरोप झाला होता आणि निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची भीतीही व्यक्त झाली होती. मात्र, राष्ट्रवादीला कधी नव्हे इतके स्पष्ट बहुमत मिळाले. शर्माच्या बदलीनंतर धडाडीसाठी प्रसिद्ध असलेले परदेशी आयुक्त झाले. त्यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा विषय प्राधान्याने हाताळला. या कारवाईबरोबरच त्यांनी अनेक चांगले निर्णय घेत त्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी पाठपुरावाही केला. मात्र, ते उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्या पश्चात अनूपकुमार यादव यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाची धुरा आली. मात्र, त्यांनी कोणतेही ठोस निर्णय घेण्याचे टाळले. ‘माझ्याकडे फायली आणू नका’ असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विकासकामांचा वेग मंदावला. अधिकारी व कर्मचारी पुन्हा मस्तवाल बनू लागले.
दुसरीकडे, सत्तारूढ राष्ट्रवादीमध्ये विस्कळीतपणा असून कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे चित्र पुढे आले आहे. महापौर व पक्षनेत्यांमध्ये सुसंवाद नाही. नगरसेवकांमध्ये एकवाक्यता नाही. आमदारांची तोंडे परस्परविरोधी दिशेला आहेत. शहराध्यक्षांचा एकपात्री प्रयोग सुरू आहे. स्थायी समितीत टक्केवारीचा खेळ सुरू आहे. भ्रष्टाचारात महिलाही कमी नाहीत, याचे विदारक चित्र अलीकडील काही घटनांमधून दिसून आले. नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांना वाली राहिलेला नाही. अजितदादांचा बालेकिल्ला व कारभारी म्हणून तेच गाडा हाकत असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे त्यांचे पूर्वीइतके शहरातील घडामोडींकडे लक्ष नाही. त्यामुळेच पालिका थंडावली व पक्षसंघटना विस्कळीत झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.