शिक्षकाला गुन्हेगार ठरवू नका.! Print

शाळांमधील शिक्षेसंदर्भात शिक्षणक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया
प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
विद्यार्थ्यांला येता-जाता शिक्षा करू नयेच; पण विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या शिक्षकाला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करणाचा प्रस्ताव हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ‘नाते’ संपवणारा आहे. भविष्यात विद्यार्थ्यांकडे डोळे वटारून पाहायला देखील शिक्षकांना भीती वाटेल आणि त्यामुळे आपली नोकरी, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी वर्गात खाली मान घालून पाठय़पुस्तकातील घटक शिकवण्याची नोकरी करणे एवढय़ापुरताच उत्साह शिक्षकांमध्ये राहील!
..ही आहे, शाळांमधील शिक्षेसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या तरतुदींवर शिक्षण क्षेत्रातून उमटलेली प्रातिनिधिक प्रतिक्रिया. शासनाने नुकत्याच मांडलेल्या ‘प्रोहिबिशन ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस इन स्कूल्स २०१२’ या प्रस्तावित विधेयकानुसार शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. या विषयी शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करूच नये. परंतु अपवादात्मक परिस्थितीत अशी काही घटना घडल्यास शिक्षकाला लगेच गुन्हेगार ठरवू नये. शिक्षकानेही पूर्वग्रहदूषिततेने विद्यार्थ्यांवर राग काढणेही योग्य नाही, पण असा कायदा झाल्यास शिक्षक कायम भीतीच्या छायेत राहतील आणि त्याचा परिणाम कळत-नकळतपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होईल, असे मत शिक्षकांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी मांडले आहे. याबाबत काही बोलक्या प्रतिक्रिया..
डॉ. प्र. ल. गावडे (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ)- ‘‘विद्यार्थ्यांला शिक्षा केल्याबद्दल शिक्षकाला गुन्हेगार ठरवणे आणि विद्यार्थ्यांला शिक्षेपासून संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची गरज वाटणे, या दोन्ही गोष्टी आपल्या गुरू-शिष्य परंपरेला साजेशा नाहीत. शिक्षा न करता विद्यार्थ्यांला वळण लावणे हेच शिक्षकाचे खरे कौशल्य आहे. पण म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांला धाक दाखवला, तर त्याला गुन्हेगार ठरवणेही अयोग्य आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील नाते हा अत्यंत नाजूक विषय आहे, त्या गोष्टीला कायद्याच्या चौकटीत बसवण्यापूर्वी त्याचा साकल्याने विचार व्हावा.’’
मृण्मयी भावे (गुरूकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका)-
‘‘शाळेत शिक्षा करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांला एखादी गोष्ट कळत नाही किंवा येत नाही म्हणून त्याला मारणे, रागावणे, बेंचवर उभे करणे योग्य नाही. आता विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्याची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे काही वेळा नकळत विद्यार्थी काही वाईट गोष्टींकडे वाहावत जात असतील, तरीही त्यांना शक्यतो शिक्षा करू नये. पण याचा अर्थ असा नाही की अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांला शिक्षा करणाऱ्या शिक्षकाला तुरूंगात टाकावे किंवा त्याला गुन्हेगार ठरवावे.’’
डॉ. मिलिंद नाईक (ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक)- ‘‘काहीवेळा विद्यार्थी हाताबाहेर गेलेला असेल, तर अशा वेळी काय करायचे? पुण्यातही काही शाळांमध्ये विद्यार्थी शाळेत चाकू घेऊन येतात, दारू पिऊन येतात, शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मारहाण होण्यापर्यंत घटना घडतात. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर संबंधित विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणे हाच पर्याय शिक्षकांसमोर राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होण्याचा पर्यायही राहणार नाही. शाळेच्या वेळामध्ये विद्यार्थ्यांची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे शिक्षकांना धोकादायक वाटू लागेल आणि शिक्षकांनाही कायद्याचे संरक्षण देणे आवश्यक वाटू लागेल. दोन-चार वाईट वृत्तीच्या शिक्षकांकडे पाहून ‘शिक्षक’ या घटकावरच अविश्वास दाखवणे योग्य ठरणार नाही.’’
सविता काजरेकर (रेणुका स्वरूप प्रशालेच्या मुख्याध्यापिका)- ‘‘विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये हा नियम काही नवीन नाही. किंबहुना शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये, मुलांच्या कलाने शिकवावे या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य धाक नसेल, तर विद्यार्थी चुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता अधिक असते. काही वाईट प्रवृत्तीचे शिक्षक असतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्यास हरकत नाही, पण त्यामुळे ‘आम्ही काहीही करू. शिक्षक काय करणार?’ किंवा, विद्यार्थ्यांची प्रत्येक गोष्ट निमूटपणे सहन करणे हेच शिक्षकाचे काम आहे’, अशा प्रकारचे वातावरण तयार होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.’’