संक्षिप्त Print

एनएसएसच्या वतीने किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी शिबिर
पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व दुर्गसंवर्धन महासंघ यांच्या वतीने एनएसएसच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एच.व्ही. देसाई महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे सचिव हसमुखभाई पटेल, एनएसएस मुख्य समन्वयक डॉ. शाकिरा इनामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहिते, शिवाजी ट्रेल या संस्थेचे मिलिंद क्षीरसागर हेही उपस्थित होते. ‘दुर्गसंवर्धनाच्या कार्यात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, मीसुद्धा त्यांच्यासोबत असेन,’ असे डॉ. कोल्हे यांनी या वेळी सांगितले.
‘मानसिक आरोग्य आणि समाज’ विषयावर परिसंवाद
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फग्र्युसन महाविद्यालयाचे ‘मानस समुपदेशन केंद्र’ आणि इंडियन असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थच्या वतीने ‘मानसिक आरोग्य आणि समाज’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ.अनिल अवचट, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. जी. देशपांडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. या वेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शोभना अभ्यंकर यांनी प्रस्तावना केली, तर डॉ. वसुधा कुलकर्णी यांनी आभार मानले.
उपचारासाठी मदतीचे आवाहन
गौरव पुरुषोत्तम तांबट (वय ५) याला लहानपणपासून ऐकू येत नाही, तसेच तो दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याच्यावर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे १० लाख इतका खर्च येणार असून त्याचे कुटुंब हा खर्च करण्यास असमर्थ आहे. तरी इच्छुकांनी जास्तीत जास्त मदत करावी. अधिक माहितीसाठी संपर्क- ९७६२६८९१३१.
बालकुमार साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २४ वे ‘अखिल बालकुमार साहित्य संमेलन’ १४ ते १६ डिसेंबर दरम्यान ओनी (राजापूर) येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनामध्ये शोभायात्रा, चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट - दादर व्होल्व्हो बससेवा सुरु
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे स्वारगेट - दादर वातानुकूलित व्होल्व्हो बस सेवेचा आरंभ आमदार माधुरी मिसाळ व आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. सकाळी सहा वाजेपासून या बसेस दर तासाला स्वारगेट व दादर वरुन सुटणार आहेत. या नवीन बस सेवेमुळे स्वारगेट, पर्वती, धनकवडी, कात्रज परिसरातून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे, असे मत माधुरी मिसाळ यांनी या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी पर्वती भाजपचे अध्यक्ष विश्वास ननावरे, श्रीकांत जगताप, मानसी देशपांडे, मनिषा चोरबोले आदी उपस्थित होते.