तुकडेबंदी कायद्यात त्वरित सुधारणा करणे गरजेचे! Print

पुणे जिल्हा विकास मंचाची मागणी
 प्रतिनिधी
तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदे कालबाह्य़ झाले असून त्यात जनहिताच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा विकास मंचाने केली आहे. मंचाचे सचिव अ‍ॅड. राजू राजुरकर यांनी ही माहिती दिली.
तुकडेबंदी कायद्यानुसार जमीन विकताना ती कमीत-कमी दहा गुंठे असणे आवश्यक असल्यामुळे जमीनधारकाला जमिनीच्या विक्रीत अनेक अडचणी येतात. मंचाने जमिनीची ही मर्यादा कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नोंदविली होती. सप्टेंबरमध्ये या मागणीचा विचार होऊन जमिनीची मर्यादा दहा गुंठय़ांवरून तीन गुंठय़ांवर आणण्याचे मान्य झाले. मात्र ही तीन गुंठय़ांची मर्यादाही कमी करून एका गुंठय़ावर आणावी अशी मंचाची मागणी आहे.
याबरोबरच महानगरपालिकेच्या हद्दीपासून किमान २० ते २५ किमीपर्यंतच्या नापीक व पडीक जमिनीला ‘रहिवासी क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात यावे, तसेच शहरालगतच्या महामार्गाजवळील गावांच्या हद्दीपासून ४ किमी परिघापर्यंतही निवासी क्षेत्र जाहीर करण्यात यावे आणि या शहराकरिता वेगळ्या टाऊन प्लॅनिंग अ‍ॅक्टची निर्मिती करावी, असे मंचाने म्हटले आहे.