दीड कोटींचे अमली पदार्थ जाळून नष्ट Print

प्रतिनिधी
शहर व जिल्ह्य़ात जप्त करण्यात आलेला दीड कोटी रुपयांचा अडीच हजार किलो गांजा, पाच किलो चरस आणि दीड किलो ब्राऊन शुगर हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. राज्याच्या गृहखात्याकडून पुणे शहर व जिल्ह्य़ात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचा नाश करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने मंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक बी. टी.   आंबेगाकर, रासानित विश्लेषक जितेंद्र जावळे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. इंगळे यांच्या उपस्थितीत वडाचीवाडी, हवेली तालुक्यातील एसआरपी फायरबट येथे एक कोटी ५५ लाख तीस हजार रुपयांचे अमली पदार्थाचा मुद्देमाल जाळून नष्ट केला. यामध्ये दोन हजार ५८९ किलो गांजा, दीड किलो ब्राऊन शुगर, चार किलो ९४३ ग्रॅम चरस आणि ९८२ ग्रॅम भांग जाळून नष्ट केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक सुनील तांबे आणि पीसीबीचे निरीक्षक अरुण सावंत यांनी मेहनत घेतली.