पु. ल. देशपांडे उद्यानात ‘पुलं’चा पुतळा बसवणार Print

प्रतिनिधी
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने विकसित केलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये ‘पुलं’चा पुतळा बसविण्याचा तसेच त्यांच्या नावाने तेथे ग्रंथालय सुरू करावे आणि ‘पुलं’चा जीवनपटही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून तेथे दाखवावा, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.
पु. ल. देशपांडे उद्यानाच्या दुसऱ्या टप्प्याचे (मुघल गार्डन) उद्घाटन करण्यासंबंधीचा विषय शुक्रवारी पक्षनेत्यांपुढे ठेवण्यात आला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि सुषमा स्वराज यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्या बरोबरच पु. ल. देशपांडे यांच्या नावाने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात ‘पुलं’च्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या साहित्याची माहिती मिळेल असेही काही उपक्रम सुरू करावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पक्षनेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उद्यानात ‘पुलं’चा पुतळा उभारण्यात येईल तसेच त्यांच्या नावाने उद्यानातच ग्रंथालय तसेच छोटे वाचनालय उभारले जाईल. ‘पुलं’चा जीवनपट उलगडून दाखवणारी ध्वनिचित्रफीत तयार करून घेतली जाईल व ती उद्यानात येणाऱ्या पुणेकरांना तसेच पर्यटकांना दाखवली जाईल.