अध्यात्म व विज्ञानाची सांगड आवश्यक - डॉ. विजय भटकर Print

पिंपरी / प्रतिनिधी
देशाचा विकास घडवायचा असेल तर अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले. विज्ञानाचे अनेक  फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माता अमृतानंदमयी विद्यालयाच्या डिजिटल कॅम्पसचे उद्घाटन डॉ. भटकरांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. यावेळी पालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, स्वामी विद्यामृतानंद पुरी, प्राचार्या पवनामृता चैतन्य आदी उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, माता अमृतानंदमयी हे डिजिटल कॅम्पस असलेले देशातील पहिले विद्यालय आहे. हे अतिशय कठीण काम असते. तरीही शाळेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आजच्या काळात आई व वडील दोघेही काम करतात, पाल्यांच्या प्रगतीत त्यांना सहभागी होता येत नाही. या सेवेमुळे त्यांना पाल्यांच्या सर्व उपक्रमांची माहिती तत्काळ मिळेल तसेच वेबसाईटवरून शिक्षकांशी थेट संपर्कही साधता येईल, असे ते म्हणाले.