कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासक्रमात बदल Print

प्रतिनिधी
कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन प्रोग्रॅम पाठोपाठ आता एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करण्यात आले असून सी.एस.चा नवीन अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)चे अध्यक्ष निसार अहमद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सी.एस. फाऊंडेशन प्रोग्रॅमचा अभ्यासक्रम १ फेब्रुवारी २०१२ पासून लागू करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार डिसेंबरमध्ये फाऊंडेशन प्रोग्रॅमची पहिली परीक्षा होणार आहे. फाऊंडेशन पाठोपाठ एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमचा अभ्यासक्रमही लागू करण्यात येणार आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार कायदे, पद्धती यामध्ये नव्याने होणाऱ्या बदलांबाबतही विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे सी.एस.च्या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक अपडेट राहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ‘कॉर्पोरेट कम्प्लायन्स एक्झिक्युटिव्ह’ हा नवीन अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची पात्रता काही प्रमाणात प्राप्त केली आहे, पण अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आयसीएसआयने विविध संस्थांशीही सहकार्य करार केले आहेत.