विकास आराखडय़ाकडे चांगल्या नजरेने पाहा- जगताप Print

प्रतिनिधी
महापालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखडय़ात एकही बदल न करता आमदारांनी तो आराखडा सहा महिन्यात राज्य शासनाकडून मंजूर करून दाखवावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना दिले आहे. विकास आराखडय़ाकडे चांगल्या नजरेने पाहा, असेही राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
शहराच्या विकास आराखडय़ावर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गंभीर आरोप केले असून या आराखडय़ाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी गिरीश बापट, माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांनी केली आहे. आमदार रमेश बागवे यांनीही आराखडय़ातील आरक्षणे बिल्डरसाठीच उठवण्यात येत असून आरक्षणे उठवू नयेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदारांकडून विकास आराखडय़ावर टीका सुरू झाल्यामुळे राष्ट्रवादीने आता आराखडा मंजुरीचा चेंडू आमदारांकडे टोलवला आहे.
आराखडय़ाबाबत राष्ट्रवादीच्या नगरेसवकांची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीची माहिती सभागृहनेता सुभाष जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, आराखडय़ाचे नकाशे उपलब्ध झालेले नाहीत अशी तक्रार आहे. मात्र, आराखडा प्रसिद्धीला मंजुरी मिळाल्यानंतरच नकाशे उपलब्ध होतील. त्यावर हरकती-सूचनाही मागवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. आराखडा लवकर मंजूर झाला पाहिजे अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. तसे प्रयत्न आम्ही करू.
आराखडय़ात तसेच विकास नियंत्रण नियमावलीत जे बदल सुचविण्यात आले आहेत ते बदल निश्चितच शहराच्या आणि नागरिकांच्याही फायद्याचे आहेत. आराखडय़ाकडे कोणत्या नजरेने बघितले जाते ते महत्त्वाचे आहे. त्यासाठी आराखडय़ाकडे चांगल्या नजरेने पाहिले पाहिजे, असेही जगताप म्हणाले.
आराखडय़ाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी आमदारांनी केली आहे. ती चौकशी त्यांनी करावी. मात्र अशी मागणी केल्यानंतर आराखडय़ात लुडबूड करायला मिळते म्हणून ही मागणी करण्यात आली आहे, असे सांगून जगताप म्हणाले की, ज्या आमदारांनी आराखडय़ाला विरोध केला आहे त्यांनी आम्ही मंजूर केलेला आराखडा राज्य शासनाकडे गेल्यानंतर शासनाकडून तो सहा महिन्यात मंजूर करून आणू, असा आम्हाला शब्द द्यावा.