रास्ता पेठेतील सराफी दुकान फोडून दोन कोटीचा ऐवज पळविला Print

प्रतिनिधी, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

रास्ता पेठेतील जे. पी. ज्वेलर्स या दुकानाच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरटय़ांनी साडेसात किलो सोने व रोख ४७ हजार असा एकूण एक कोटी ९७ लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला. दुकानामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याचे चित्रीकरण साठविणारे युनिटही चोरुन नेले आहे. गुरुवारी रात्री नऊ ते अकरा दरम्यान हा प्रकार घडला.
चोरी करणारी व्यक्ती ही येथील माहिती असणारी असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मी रस्त्यावरील पोरवाल ज्वेलर्सवर दरोडा टाकून दीड कोटीची झालेली चोरी अद्याप उघडकीस आलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे सराफी व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. जे. पी. ज्वेलर्सचे मालक किरण जवेरचंद्र सोनिग्रा (वय ३५, रा. ५०१, रास्ता पेठ) यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. व्ही. निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील अपोलो टॉकिजच्या जवळील एका जुन्या इमारतीमध्ये जे.पी. ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. सोनिग्रा हे गेल्या चाळीस वर्षांपासून सोने, चांदीच्या दागिन्याच्या विक्रीबरोबरच सावकारीचाही व्यवसाय करतात. सराफी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या दोन खोल्यांमध्ये जवेरचंद्र हे पत्नीसह राहतात, तर त्यांचा मुलगा जवळच एका सोसायटीमध्ये राहतो. जवेरचंद्र व त्यांची पत्नी या दुकानातच झोपतात. या घटनेबाबत जवेरचंद्र यांनी सांगितले की, आपण गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन मुलाच्या घरी जेवण्यासाठी गेलो. रात्री सव्वा अकराच्या सुमारास दोघेही घरी आलो. त्या वेळी त्यांच्या पत्नीला पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. दुकानात जाऊन पाहिले असता शोकेसमध्ये ठेवलेले नेकलेस, कर्णफुले, अंगठय़ा, रिंग असे साडेसात किलोचे दागिने व ४७ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे दिसले. चोरटय़ांनी चांदीच्या दागिन्यांना हातही लावला नव्हता.  त्यांनी तत्काळ मुलास याबाबत माहिती देऊन पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.      

  सीसीटीव्ही फुटेजही पळविले
जे. पी. ज्वेलर्स दुकानात एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील एक कॅमेरा हा दरवाजाजवळ असून तीन कॅमेरे दुकानात आहेत. चोरटय़ांनी सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर युनिटही दागिन्यांबरोबर चोरुन नेले. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर समर्थ, लष्कर, बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांची चार तपास पथके तयार केली आहेत. त्यांना विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलीसही याचा समांतर तपास करत आहेत. सराफी पेढीची मागील बाजू माहिती असणाऱ्यानेच पाळत ठेवून ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे.