वाळू उपसा करताना जप्त केलेला जेसीबी पळवून नेणाऱ्यास अटक Print

शिरूर/वार्ताहर
महसूल पथकाने अनधिकृतपणे वाळू उपसा चालू असताना छापा टाकून जप्त केलेला जेसेबी घेऊन जाणाऱ्या तलाठय़ास दमदाटी करून पळवून नेणाऱ्यास शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती.
बाळासाहेब विष्णू वाघचौरे (रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेगाव पागा नदीपात्रामध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी महसूल विभागाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला.
या ठिकाणी वाळू उपसा करणारा जेसीबी जप्त करून तलाठी बी.एस. टाचले व बी.एन. गुजर घेऊन जात होते. रस्त्यात यांना दमदाटी करून त्यांच्याकडील मोबाईल व जेसीबी पळवून नेला होता. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.