रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्यांविरोधात मोहीम Print

पुणे / प्रतिनिधी
दिवाळीच्या कालावधीत रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वेच्या पुणे विभागात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले.
दिवाळीत प्रवाशांची वाढती संख्या व त्यानुसार गाडय़ांना अतिरिक्त डब्यांची व्यवस्था देण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. फटाके, रॉकेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर आदी साहित्य घेऊन रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी आहे. हे पदार्थ घेऊन प्रवास करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुले रेल्वे किंवा रेल्वेच्या परिसरात असे पदार्थ घेऊन कोणी आढळल्यास ९००४४१४४४४ या मोबाईल क्रमांकावर सुरक्षा कक्षाला त्याबाबतची माहिती द्यावी किंवा एसएमएस करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे- पटना विशेष गाडी
प्रवाशांची संख्या लक्षात घेता ९ नोव्हेंबरला पुणे-पटना, तर ११ नोव्हेंबरला पटना- पुणे या दोन विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. पुणे- पटना गाडी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पुण्यातून सुटेल व ११ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता पटना येथे पोहोचेल. पटना-पुणे गाडी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी पटना येथून सुटेल. १३ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास ती पुण्यात दाखल होईल.