राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये शिक्षकांची २४८ पदे तयार करणार Print

पुणे / प्रतिनिधी
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये नव्याने २४८ शिक्षकांची पदे निर्माण करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन यांनी दिली.
राज्यात सध्या ४५ शासकीय तंत्रनिकेतने आहेत, त्यापैकी २५ तंत्रनिकेतनांसाठी ही पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिल्या वर्षी ११६, दुसऱ्या वर्षी ७६ आणि तिसऱ्या वर्षी ५६ या प्रमाणे तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १६ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील २५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये २००७-०८ पासून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आणि काही अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिली होती. त्यानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे आणि प्रवेश क्षमता वाढल्यामुळे तंत्रनिकेतनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता भासत होती. त्यामुळे अध्यापनाच्या कामात अडचणी उत्पन्न होत होत्या. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.