पालिकेच्या लोकशाही दिनात अपर जिल्हाधिकारीही येणार Print

पुणे/प्रतिनिधी
महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनामध्ये या महिन्यापासून अपर जिल्हाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या संबंधीच्या शासन आदेशाचे गेल्या तेरा वर्षांत पालन होत नव्हते, ही वस्तुस्थितीही माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
माहिती अधिकारासंबंधी महाराष्ट्र शासनाने २९ डिसेंबर १९९९ काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे पुणे महापालिकेतील लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले  होते.
या परिपत्रकानुसार पुणे महापालिकेत झालेल्या प्रत्येक लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा यांची माहिती द्यावी, असा अर्ज सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिला होता.
या माहिती अधिकारात त्यांना आजपर्यंत असा कोणीही अधिकारी महाापालिकेतील लोकशाही दिनात उपस्थित नव्हता, असे उत्तर देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकारी महापालिकेतील लोकशाही दिनात आजपर्यंत उपस्थित राहिलेला नसला, तरी ही बाब निदर्शनास आल्यानंतर मात्र त्यासंबंधीचे आदेश लगेचच काढण्यात आले आहेत.
महापालिकेतील लोकशाही दिनात उपस्थित राहण्यासंबंधीचा आदेश नगरपालिका प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यापुढे उपस्थित राहतील.