तळवडे येथे बर्फ बनविण्याच्या कारखान्यात अमोनियम वायूची गळती Print

सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुणे / प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
तळवडे येथील बर्फ बनविणाऱ्या श्री स्वामी समर्थ कारखान्यात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाईप तुटल्यामुळे अमोनियम वायूची गळती झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच पोहचून गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तळवडेतील सहयोगनगर येथे हा बर्फ बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बर्फ बनविण्यासाठी लागणारा अमोनियम या वायूचा सिलेंडर असून रबरी पाईपमधून या वायूचा पुरवठा केला जातो.
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक रबरी पाईप तुटून अमोनियम वायूची गळती झाली. हा वायू कारखान्यात पसरल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलास फोन करुन घटनेची माहिती दिली. या ठिकाणी तत्काळ अग्निशामक दल व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तोंडाला मास्क लावून ही गळती थांबविली. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये गळती थांबविण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.