संक्षिप्त Print

वृत्तपत्र विक्रेता संघाचा कौटुंबिक स्नेहमेळावा
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कोथरुड शाखेच्या वतीने या भागातील विक्रेत्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. विक्रेत्यांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले. तसेच, मृत विक्रेत्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदतही देण्यात आली. अ‍ॅड.भास्करराव आव्हाड, आमदार चंद्रकांत मोकाटे, बजरंग लोहार, ज्ञानेश्वर येनपुरे यांच्यासह पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विक्रेते यावेळी उपस्थित होते.
कर्वे समाज सेवा संस्थेचा सुवर्ण महोत्सव
कर्वे समाज सेवा संस्था, पुणे यांचा सुवर्ण महोत्सवी वर्षांचा उद्घाटन समारंभ ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता कर्वे समाज संस्थेत होणार आहे. याप्रसंगी, केंद्र शासनाच्या नियोजन आयोगाच्या सदस्या डॉ.सईदा हमीद, उद्योजिका अनु आगा उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षांत संस्थेतर्फे सांस्कृतिक महोत्सव, माजी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन, ‘समकालीन विश्वातील समाजकार्य शिक्षण : समस्या व आव्हाने’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद, राज्यस्तरीय कार्यशाळा, विचारवंतांचे संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आर्थिक मदतीसाठी आवाहन
 प्रवीण थोरात (वय ३९) हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर पुना हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यासाठी साधारण ३ लाख २० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च करण्यास त्यांचे कुटुंबीय पूर्णत: असमर्थ आहेत. तरी त्यांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ९६२३२३३०२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तर समीर बुढन काकर (वय २४) हे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर पुना हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून शस्त्रक्रियेसाठी ५ लाख
रुपये खर्च येणार आहे. हा खर्च पूर्ण करण्यास त्यांचे कुटुंबीय असमर्थ आहेत. तरी मदतीस इच्छुकांनी समीर बुढन काकर, पूना हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर, ओपीडी क्रमांक ११०९१४३४७ या पत्त्यावर मदत पाठवावी. अधिक माहितीसाठी ९५५२४५१८३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
‘सहकार वैभव’ अनुबोधपट
 सांगली वैभव को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-२०१२’ निमित्त सोसायटीतर्फे  ‘सहकार वैभव’ या अनुबोधपटाची निर्मिती करण्यात आली आहे. व्यावसायिक स्पर्धा, आर्थिक संघर्ष, व्यवस्थापनविषयी त्रुटी यांचा एकत्रित परिणाम सहकारी उद्योग व्यवसायवर होऊन काही व्यवसाय बंद पडले आहे तर काही व्यवसायांची सामाजिक परिस्थितीनुसार संशोधक प्रगतीनुसार नवनिर्मितीही झाली. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या अनुबोधपटाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती पी. आर. पाटील यांनी दिली. या अनुबोधपटात मुख्यमंत्र्यांपासून शरद पवारांपर्यंत सर्व मान्यवरांच्या मुलाखती चित्रित केल्या आहेत. या अनुबोधपटाची निर्मिती आनंद माडगूळकर यांनी केली आहे.