पुणे बुक फेअर बुधवारपासून सुरू Print

प्रतिनिधी
विविध विषयांवरील आणि वेगवेगळ्या भाषांतील पुस्तकांचा समावेश असलेले पुणे बुक फेअर हे ग्रंथप्रदर्शन बुधवारपासून (७ नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे भरविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे मूकपटापासून ते ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलेनिअपर्यंतचा भारतीय चित्रपटांचा इतिहास पोस्टर्सद्वारे दाखविण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, अशी माहिती पुणे बुक फेअरचे संचालक पी. एन. आर. राजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘केशवसुतांची कविता : एक समृद्ध वारसा’ या विषयावर डॉ. नीलिमा गुंडी यांचे व्याख्यान होईल. श्याम भुर्के आणि गीता भुर्के ‘आनंदयात्री पुलं’ कार्यक्रम सादर करतील, तर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलाखत होणार आहे.