राष्ट्रवादीच्या पिंपरी कार्यकारिणीला मुहूर्ताचा शोध Print

पिंपरी / प्रतिनिधी
आगामी २०१४ च्या निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागलेल्या आणि पिंपरीचे मॉडेल राज्यभरात राबवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मात्र ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आहे. शहराध्यक्षांची निवड होऊन सहा महिने झाले तरी शहर कार्यकारिणी जाहीर होऊ शकली नाही. अजित पवार यांनी पुण्यातील अधिवेशनात याबाबत सूचना करूनही ‘जैसे थे’ परिस्थिती आहे.
माजी महापौर योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. वेळोवेळी कार्यकारिणी जाहीर करण्याची घोषणा करूनही त्यांना अद्याप यश आले नाही. पक्षाचे स्थानिक नेते, आमदार व नगरसेवकांकडून नावे मागवण्यात आली. तेव्हा अनेकांनी सुरुवातीला नावेच दिली नाही आणि दिली तेव्हा जास्त संख्येने दिल्याने निवड कोणाची करायची, असा प्रश्न निर्माण झाला. खूपच विलंब होत गेल्याने हा विषय अजितदादांकडे गेला. तेव्हा कार्यकारिणीत कोणाकोणाचा समावेश असणार, याची प्राथमिक माहिती आपण घेणार असून त्यानंतरच ती जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. बहल यांना संघटनात्मक कामाची फारशी माहिती नाही. यापूर्वीच्या कार्यकारिणीतील अभ्यासू कार्यकर्त्यांची त्यांना फेरनिवड करावी लागणार आहे. शहराध्यक्षास सर्वाना बरोबर घेऊन काम करावे लागते. मात्र, पक्षातील सद्यपरिस्थिती व बहलांना असलेला कडवा विरोध पाहता ते अवघडच असल्याचे दिसते.
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी संघटनात्मक पातळीवर सगळीच बोंब असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पक्षाच्या कार्यक्रमांकडे नगरसेवक व नेतेच फिरकत नाही. एखाद्या विषयावर आंदोलन करण्याचे आदेश ‘वरून’ आले. तर, त्याची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न नेत्यांना पडतो. पदावर असणारी मंडळी कार्यकर्त्यांशी फटकून वागतात. सत्ता असूनही प्रभागात कामे होत नसल्याची सत्ताधारी नगरसेवकांचीच तक्रार आहे. त्याचप्रमाणे अधिकारी कामे करत नसल्याची कार्यकर्त्यांची व्यथा आहे. कितीही नाही म्हटले तरी शहर राष्ट्रवादीवर गटबाजीचे सावट आहे. आगामी काळात राष्ट्रवादीसमोर विरोधकांचे कडवे आव्हान आहे. मात्र, दिव्याखालचा अंधार दूर करून बालेकिल्ल्याची दुरुस्ती केल्याशिवाय तरणोपाय नाही. स्थानिक पातळीवर हे शक्य नसल्याने ती शिष्टाई अजितदादांनाच करावी लागणार आहे.