पिस्तूल, रिव्हॉल्व्हर विकणाऱ्या तरुणाला शिरूरजवळ अटक Print

शिरूर/प्रतिनिधी
शिरूर येथील घोडनदीच्या सतरा कमान पुलानजीक पुणे-नगर बाह्य़ मार्गावर रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या आरोपींला तीन रिव्हॉल्व्हर व काडतुसासह शिरूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख चारशे रुपयांचा माल जप्त केला आहे.
शिरूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली, की एक माणूस रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी पल्सर गाडीवर घोडनदीच्या पुलानजीक येणार आहे. या माहितीच्या आधारे या पथकाने साध्या वेशातील पोलिसांसह सापळा रचला आणि त्याला पकडण्यात आले. प्रताप मंजाबा साळुंके (वय ४८, रा. गुणवरे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचे एक लोखंडी पिस्तूल, २० हजारांचे एक रिव्हॉल्व्हर, तसेच एक २० हजार किमतीचा गावठी कट्टा, पितळी धातूची जिवंत काडतुसे व बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल असा एक लाख ४०० रुपयांचा माल जप्त केला, अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली.