पिंपरीत चव्हाण रुग्णालयातून नवजात बालकास पळविले Print

‘ती’ महिला सीसीटीव्हीत कैद
पिंपरी / प्रतिनिधी
मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरीतही नवजात बालक पळवण्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून सकाळी साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात महिलेने हे बालक घेऊन पोबारा केला. ती महिला सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस व रुग्णालय प्रशासनाकडून तिचा शोध सुरू आहे. दरम्यान, चव्हाण रुग्णालयात प्रथमच असा प्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे.
खेड पिंपळगाव येथील एका महिलेला पहाटे अडीचच्या सुमारास चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचच्या सुमारास तिच्यावर सिझर करण्यात आले. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिची भाची डबा घेऊन आली. शस्त्रक्रिया झाली असल्याने ती महिला झोपलेली होती म्हणून अन्य सर्व डबा खाण्यासाठी गेले. त्याचवेळी एका अज्ञात महिलेने त्या नवजात बालकाला घेऊन पोबारा गेला. डबा खाऊन आलेल्या नातेवाईकांना बालक जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही बालक न सापडल्याने रुग्णालय प्रशासनाला कळवण्यात आले. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी समक्ष येऊन माहिती घेतली व पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर रुग्णालयात बालकाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दुपारी एकच्या सुमारास एक पंजाबी पध्दतीचे कपडे परिधान केलेली महिला हातात मुलाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. या महिलेचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात प्रथमच अशाप्रकारची घटना घडली. यापूर्वी विविध घटनांमधून येथील ढिसाळपणा व सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे उघड झाले होते. त्यात आणखी एका प्रकाराची भर पडली आहे.