‘राष्ट्रवादीने फसवल्याचे पठारे यांच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले’ Print

प्रतिनिधी
पुणे शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा हे फक्त निवडणुकीतील आश्वासन होते, हे आमदार बापू पठारे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीने पुणेकरांना फसवल्याचेही सिद्ध झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
निवडणुकीत सगळेच पक्ष आश्वासने देतात. चोवीस तास पाणीपुरवठय़ाचेही आश्वासनच होते, असे वक्तव्य आमदार पठारे यांनी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या घोषणा वेगळ्या आणि कृती वेगळी हेच पुणेकरांना दिसले आहे. तसेच, पठारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुणे शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात राष्ट्रवादीला आलेले अपयशही सिद्ध झाले आहे, असे प्रा. मठकरी म्हणाले.
पुण्याला चोवीस तास पाणी लागतेच कशाला, चोवीस तास पाणी दिले तर सध्या चाळीस टक्के पाण्याची गळती होते; ती ऐंशी टक्क्य़ांवर जाईल, असा जावईशोध लावणाऱ्या आमदार पठारे यांनी ही गळती कशा पद्धतीने ऐंशी टक्क्य़ांवर जाईल ते पुणेकरांना सांगावे, अशीही मागणी प्रा. मठकरी यांनी या वेळी केली.