ते पठारे यांचे वैयक्तिक मत; राष्ट्रवादी सहमत नाही Print

चोवीस तास पाणीपुरवठय़ाचा वाद
प्रतिनिधी
पुणेकरांना नियमित आणि चोवीस तास पाणी मिळाले पाहिजे, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. पक्षाचे आमदार बापू पठारे त्या भूमिकेच्या विरोधात काही बोलले असतील, तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या मताशी राष्ट्रवादी अजिबात सहमत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत राष्ट्रवादीने आज आमदार पठारे यांची पाठराखण करायला ठाम नकार दिला.
पुण्याला चोवीस तास पाणी हवेच कशाला, चोवीस तास पाणी घेऊन पुणेकरांना काय वॉशिंग सेंटर काढायचे आहे का, असा जाहीर प्रश्न आमदार पठारे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना विचारला होता. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनेच चोवीस तास पाण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण पठारे यांना करून दिल्यानंतर ‘निवडणुकीत सर्व पक्ष आश्वासने देतातच’ अशीही मल्लिनाथी त्यांनी केली होती. पठारे यांच्या या वक्तव्यावर जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटली असून, खुद्द राष्ट्रवादीनेही त्यांची भूमिका योग्य नसल्याचे जाहीर केले आहे.
आमदार पठारे यांच्या वक्तव्याबाबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांना विचारले असता ते म्हणाले, की पुणेकरांना नियमितपणे आणि चोवीस तास पाणी मिळाले पाहिजे, हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे आणि आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत. त्याबाबत पठारे यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. या विषयाबाबत त्यांच्याकडून खुलासा मागणे वा ते नक्की काय म्हणाले, याची चौकशी करणे या प्रक्रिया संबंधित पदाधिकारी करतील.