उच्च शिक्षण संचालनालयावर प्राध्यापकांचा मोर्चा Print

प्रतिनिधी
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो)यांच्यातर्फे प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (५ नोव्हेंबर) उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये राज्यभरातील साधारण दीड हजार प्राध्यापक सहभागी झाले होते.
सहाव्या वेतन आयोगातील केंद्र सरकारकडून मिळणारी ८० टक्के रक्कम त्वरित द्यावी, नेट -सेटमधून सूट मिळालेल्या प्राध्यापकांना नियमित करून त्यांना वेतनातील फरक देण्यात यावा, उच्च शिक्षणातील कायम विनाअनुदानित धोरण बंद करावे, प्राध्यापकांसंदर्भातील सर्व शासननिर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, निवृत्तिवय ६० वरून ६५ वर्षे करावे अशा काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत एमफुक्टोच्या सदस्य आणि पुणे युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनच्या (पुटा) च्या अध्यक्ष डॉ. हेमलता मोरे यांनी सांगितले, ‘‘याच मागण्यांसाठी परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी शासनाने जूनपर्यंत सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने आश्वासन न पाळल्यामुळे आता पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. प्राध्यापकांच्या वेतनापैकी ८० टक्के रक्कम केंद्र शासनाकडून मिळणार असतानाही ही रक्कम राज्य शासनाने दिलेली नाही. शासनाने लवकरात लवकर प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही, तर हिवाळी अधिवेशनावेळी नागपूर येथेही आंदोलन करण्यात येणार आहे.’’