शहरात तोतया पोलीस व सोनसाखळीचोरांचा सुळसुळाट Print

प्रतिनिधी
शहरात तोतया पोलीस व सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून गेल्या चोवीस तासात चार सोनसाखळी चोरीच्या, तर तीन तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण पावणे सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा सोनसाखळी चोरी व तोतया पोलिसांकडून फसवणुकीचे सत्र सुरू आहे. रविवारी वानवडी, कोंढवा आणि कोथरुड येथे तीन ज्येष्ठ महिलांना पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याजवळील साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.  तर, निगडी, खडक, फरासखाना, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ज्येष्ठ महिलांचे सव्वा दोन लाखांचे दागिने हिसकावून नेले आहेत. संगीता गुरमुख गुरबानी (वय ६५, रा. स्वामी विवेकानंदनगर, वानवडी), जाईस जोसफ डिसुझा (वय ५३, रा. कोंढवा खुर्द) आणि ललित प्रभाकर कलावडे (वय ६७, रा. तारा टॉवर्स, वारजे) यांची दोन अनोखळी तरुणांनी पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले. हातचलाखी  करुन त्यांचे दागिने चोरुन नेले. ‘पोलीस नागरिकांना अंगावरील सोने काढण्यास सांगत नाहीत. असे कोणी केल्यास त्या व्यक्तीला आपले ओखळपत्र मागावे व तत्काळ पोलिसांना कळवावे,’ असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रतिभा रामचंद्र मोंढे (वय ७५, रा. शनिवार पेठ), गंगामती सुनील पामू (वय ४२, रा. भवानी पेठ), कांता नारायण यादव (वय ५५, रा. संभाजीनगर, चिंचवड) आणि मालिनी राजाराम बाठे (वय ६४, रा. सदाशिव पेठ) यांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरुन आलेल्या सोनसाखळी चोरांनी हिसकावून नेल्याच्या घटना रविवारी दिवसभरात घडल्या.