पक्षाचे निरीक्षक आज पुण्यात; काँग्रेस उमेदवारासाठी चाचपणी Print

पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
 प्रतिनिधी
काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून पुण्यातील उमेदवाराच्या नावासंबंधी चर्चा करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.
आगामी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने मात्र पुण्याच्या जागेवर लोकसभेची निवडणूक कोणी लढवावी याची चाचपणी सुरू केली असून पक्षाचे निरीक्षक, पंजाबचे माजी आमदार केवलसिंग धिल्लन त्यासाठी मंगळवारी पुण्यात येत आहेत.
निरीक्षकांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता काँग्रेस भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी, आजी-माजी आमदार, ब्लॉक अध्यक्ष यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. लोकसभा उमेदवारासंबंधी या सर्वाची मते बैठकीत जाणून घेतली जातील. तसेच संभाव्य नावांबाबत चर्चा होईल.
पक्षाचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्या नावाचा आग्रह या वेळी धरला जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेसच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये तसेच नगरसेवकांमध्ये कलमाडी समर्थकांचा भरणा असून कलमाडी यांना पक्षात घ्यावे आणि त्यांनाच पुण्यातून उमेदवारी द्यावी, असा कलमाडी समर्थकांचा आग्रह आहे. ही भूमिका ते निरीक्षकांपुढे मांडतील. महापालिकेतील एका कार्यालयाच्या उद्घाटनाला कलमाडी यांना निमंत्रित करून या गटाने मध्यंतरी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. त्याचाच पुढचा भाग मंगळवारी होण्याची शक्यता आहे. पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी कलमाडी उत्सुक असून गेले माझ्या नावाचा आग्रह निरीक्षकांकडे धरा, अशी विनंती ते पदाधिकाऱ्यांना करत असल्याचीही चर्चा महापालिकेत ऐकायला मिळाली.
काँग्रेसचे आमदार मोहन जोशी हेही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याकडे या बैठकीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, की सोमवारी संध्याकाळी मला या बैठकीचा निरोप मिळाला. वास्तविक, ही बैठक चार-पाच दिवसांपूर्वीच प्रदेशाकडून निश्चित झालेली आहे. मात्र, मुद्दामहून काही जणांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. निरोप एवढय़ा उशिरा का अशी विचारणा मी केली असता, बैठकीची पत्रे कुरिअरने पाठवल्याचे मला सांगण्यात आले आणि ते पत्र मला आज अखेर मिळालेले नाही. तरीही बैठकीत उपस्थित राहून मी योग्य ती चर्चा निरीक्षकांबरोबर करणार आहे. आमदार शरद रणपिसे यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली.