कैद्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व येथे सुरु Print

प्रतिनिधी
येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवारपासून बालगंधर्व कलादालनात सुरु झाले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  हे प्रदर्शन गुरूवापर्यंत सर्वासाठी खुले राहणार आहे.
या वेळी राज्याच्या कारागृहाच्या प्रमुख मीरा बोरवणकर, येरवडा कारागृहाचे पोलीस अधीक्षक योगेश देसाई आदी उपस्थित होते. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या उत्पादनातून मजुरीच्या स्वरुपात त्यांना मोबदला देण्याच्या हेतूने राज्याच्या सुधारणा व पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत येरवडा कारागृहात कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वस्त्रोद्योग, सुतारकाम, चर्मोद्योग, पेपरविभाग, रसायन विभाग, बेकरी अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. पेंटींग विभागात काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व येथे भरविण्यात आले आहे. सकाळी अकरा ते रात्री आठ दरम्यान हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.