दुर्ग संवर्धक महासंघाचे डॉ. कोल्हे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर Print

पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ४० हून अधिक संस्थांच्या ‘दुर्ग संवर्धक महासंघा’ चे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे काम पाहणार आहेत. त्याद्वारे ते दुर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदानाबरोबरच निधी मिळवून देण्यासाठीसुद्धा मदत करणार आहेत.
दुर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना एकत्र करून या महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे राज्यातील तरुण एकत्रितपणे दुर्ग संवर्धनाचे काम करतात. त्यासाठी महासंघातर्फे पुणे, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, सांगली, नाशिक व सिंधुदुर्ग या ठिकाणी विविध गटांची उभारणी केली आहे. आता डॉ. कोल्हे त्याचे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत. याबाबत डॉ. कोल्हे यांनी सांगितले, की शिवछत्रपतींनी लढविलेले गडकोट हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. या गडकोटांचे जतन व संवंर्धन ही महाराष्ट्राची गरज आहे, त्यासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.
या उपक्रमाबाबत माहितीसाठी ९८२२६३४५५२, ९७६२१०५५००, ९९२३५९५७५७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.