‘शादी डॉटकॉम’ वरुन ओळख झाल्यानंतर वानवडीतील महिलेस तीन लाखाला गंडविले Print

प्रतिनिधी
शादी डॉटकॉमवरुन ओळख झाल्यानंतर पुण्यातील एका महिलेस मुंबई येथे एक सदनिका खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील तीन लाखांचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिजवाना सज्जाद बारगिर (वय ४१, रा. वानवडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरिफ खान (रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवाना यांनी आपल्या मावशीच्या लग्नासाठी शादी डॉटकॉमवर नोंदणी केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत:चा फोनक्रमांक दिला होता. काही दिवसांनी आरिफ याने त्या क्रमांकावर फोन केला. तोपर्यंत रिजवाना यांच्या मावशीचे लग्न झाले होते. मात्र, आरिफ याने आपण उद्योजक असल्याचे सांगून रिजवाना यांच्याशी ओळख वाढविली.
मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे एका मित्राची सदनिका विकायची असून, ती रिजवाना यांनी घ्यावी, म्हणजे कमाईचे साधन सुरु होईल, असे आरिफने त्यांना सांगितले. रिजवाना यांनी आपल्याकडे केवळ तीन लाखांचे दागिने असल्याचे सांगितले. आरिफ याने आपण दोघे मिळून सदनिका खरेदी करु असे सांगून बँकेतले दागिने काढण्यास सांगितले. त्यानुसार त्या २२ ऑक्टोबर रोजी दागिने घेऊन वानवडी येथे आल्या. तिथे आरिफ याने आपल्याला इंदोर येथे एक महत्त्वाचे काम आले असून त्या ठिकाणी जात आहे, असे सांगून त्यांची सोन्याची बॅग घेऊन तो पसार झाला. त्या दिवसापासून आरिफ न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक एस.एन.हुलवान तपास करत आहेत.