‘केवायसी’ अर्जाबाबत गॅस ग्राहकांमध्ये संभ्रम Print

ग्राहकांनी वितरकाकडे चौकशी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी
गॅस कंपन्या व वितरकांकडून योग्य प्रकारे खुलासा करण्यात येत नसल्याने केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज नेमका कुणी भरावा याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. गॅस कंपन्यांनी हे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढल्याने त्याबाबत मुख्यत: कंपन्यांनी योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. केवायसी अर्ज भरण्याबाबत प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे निकष असल्याने संभ्रमता निर्माण झाली असल्याचे काही वितरकांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी ग्राहकांनी संबंधित वितरकांकडे चौकशी करून आपल्या गॅस कनेक्शनची स्थिती जाणून घ्यावी, असे मत व्यक्त केले जात
आहे.
एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच पत्त्यावर असलेली वेगवेगळ्या कंपन्यांची एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. त्यानुसार काही कनेक्शन सध्या बंद करण्यात आली आहेत. वेगवेगळी दोन कुटुंबं त्याचप्रमाणे इतर निकषांनुसार गॅस कनेक्शन कायम ठेवायची असल्यास प्रथमत: केवायसी अर्ज भरून देणे गरजेचे आहे. सध्या कनेक्शन बंद करण्यात आलेल्या ग्राहकांनी हा अर्ज भरणे गरजेचे आहेच; मात्र त्याशिवाय आणखी कोणत्या ग्राहकांनी हा अर्ज भरावा, याबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे. केवायसी अर्ज भरून देण्याची मुदत आता १५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. या मुदतीत हे अर्ज भरणे गरजेचे आहे.
प्रत्येक गॅस कंपन्यांकडून हे अर्ज भरण्यासाठी वेगवेगळे निकष ठरविण्यात आले आहेत. काही कंपन्या सरसकट सर्वानी अर्ज भरून घेण्याचे वितरकांना सांगत आहेत, तर काही कंपन्या केवळ कनेक्शन बंद केलेले किंवा दोन कनेक्शन असलेल्यांकडून अर्ज भरून घेण्याचे सांगत आहेत. या गोंधळामुळे संभ्रम आणखी वाढत आहे. त्यामुळे काही वितरकांकडूनही सरसकट सर्वाकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे कंपन्यांनी याबाबत योग्य खुलासा करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. काही वितरकांनी त्यांच्या एजन्सीत केवायसी अर्ज भरण्याची गरज असणाऱ्या ग्राहकांचे क्रमांक लावले आहेत. त्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. ग्राहकांनी आपल्या कनेक्शनच्या स्थितीबाबत वितरकांकडून माहिती घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे.