राष्ट्रवादीकडील ‘मावळ’ वर काँग्रेसचा दावा Print

पिंपरी / प्रतिनिधी
आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी जोरदार मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय निरीक्षकांसमोर केली. राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रहही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धरला. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी ताकद मिळत नाही, सत्ता असूनही पदे मिळत नाहीत व कामेही होत नाहीत, अशा तक्रारींचा सूरही आळवण्यात आला.
लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून मंगळवारी काँग्रेसचे निरीक्षक केवलसिंग धिल्लन यांच्या उपस्थितीत पनवेल मार्केट यार्ड येथे मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, िपपरीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रदेश सचिव सचिन साठे, चंद्रकांत सातकर व मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.  वेगवेगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली. त्यात मावळ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी होत होती. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह दिसून येत होता. मावळ, िपपरी व चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघ मिळून लोकसभा मतदारसंघातील ६० टक्के मतदार आहेत, ही बाब िपपरी शहर काँग्रेसने निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. या पट्टय़ात काँग्रेसचा हक्काचा मतदार मोठय़ा संख्येने आहे. िपपरी पालिकेतील काँग्रेसच्या १४ पैकी ११ नगरसेवक याच मतदारसंघात येतात. त्यामुळे मावळ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. कोणाविषयी तक्रारी न करता मतदारसंघाविषयीच माहिती देण्याची सूचना निरीक्षकांनी सुरूवातीलाच केली होती. मात्र, पक्षाकडून ताकद मिळत नाही, यासारख्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या.    
पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय- रामशेठ ठाकूर
पक्षाचे निरीक्षक आले व त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे, याविषयीची माहिती त्यांनी घेतली, असे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. मतदारसंघाचे वाटप, आघाडी किंवा स्वतंत्रपणे लढण्याविषयीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.