आनंदाची पणती तेवावी म्हणून अशीही कृतज्ञता! Print

श्रीराम ओक
दिवाळीचा सण घराघरातून साजरा होत असताना, नोकरदार मंडळींना मिळणारा बोनस हा त्यांचा आनंद द्विगुणीत करतो. पण ज्या शिक्षकांना वेतनच मिळत नाही, त्यांचे काय..? शिकविण्याची आवड म्हणून अपेक्षेविना हे काम करणारे शिक्षकांच्या कुटुंबीयांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी म्हणून काही समाजसेवी मंडळी पुढे सरसावली.. अन् आनंदाची पणती तेवावी म्हणून त्यांनी ‘अर्थ’रूप कृतज्ञता व्यक्त केली!
कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना सामाजिक कार्यात कायम सहभागी होणाऱ्या हरिओम तथा सदाशिव मालशे यांचा ग्रामीण भागातील शाळांशी नित्याचा संपर्क असतो. या संपर्कातून आणि देगणीदारांच्या माध्यमातून ते विविध सामाजिक संस्था, अनाथाश्रमांना देणग्या मिळवून देण्याचे कार्य करतात. याच कार्याच्या निमित्ताने पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर उरळीकांचन येथे असलेल्या अण्णासाहेब कुल माध्यमिक विद्यालयाला तसेच कामशेतजवळील सांगिसे या गावातील कै. उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या शाळांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो. अत्यंत बिकट परिस्थितीत चालविल्या जाणाऱ्या या शाळांमधील अण्णासाहेब कुल माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना वेतनच मिळत नाही, तर लोखंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या शिक्षकांना अत्यल्प वेतन मिळते तरीदेखील हे कार्य ही शिक्षक मंडळी वर्षांनुवर्षे विनातक्रार करीत आहेत. मुख्य म्हणजे येथे विद्यादान करणारे हे शिक्षक तेथील स्थानिक नसून लांबच्या गावांमधून आले आहेत. अशा या शिक्षकांच्या घरची दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी श्री. मालशे यांनी सुनिती फडके, शोभना रानडे आणि सुरेश जोशी व फडके कुटुंबीय अशा देणगीदारांबरोबर या संदर्भात चर्चा केली. यापैकी काही देणगीदारांनी या शाळांना यापूर्वी भेट दिली होती, तसेच काही आर्थिक मदतही केली होती. त्यांनी ही कल्पना लगेचच उचलून धरली. खोल्या बांधण्याच्या मदतीपासून अनेक बाबतीत या दानशुरांचा सहभाग होता. या सगळ्यांच्या सहकार्यातून ‘अण्णासाहेब कुल माध्यमिक विद्यालय’ आणि ‘कै. उषाताई लोखंडे चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा एकोणीसजणांच्या दिवाळीतील आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी प्रत्येकाला रोख रक्कम देत कृतज्ञता व्यक्त केली. केवळ यावर्षी पुरताच नाही, तर दरवर्षी अशा व्रती शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानसदेखील यावेळी श्री. मालशे यांनी व्यक्त केला.