नशेत बरळल्यामुळे खुनी पती पोलिसांच्या जाळ्यात Print

घरगुती कारणावरून घेतला पत्नीचा जीव
प्रतिनिधी
पत्नी व्यवस्थित काम करत नसल्याच्या कारणावरून तिच्या डोक्यात कठीण वस्तू मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर दारूच्या नशेत बरळल्यामुळे पोलिसांनी त्याला घटनेनंतर एका तासाच्या आत अटक केली.
श्रद्धा वसंत ऊर्फ पुंडलिक विष्णू दीक्षित (वय २५, रा. नाना पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती वसंत ऊर्फ पुंडलिक विष्णू दीक्षित (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे. तर सासू लीला विष्णु दीक्षित, नणंद पूनम दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा व वसंत याचा २०१० मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्यांची मुलगी आहे. वसंत हा एका मोटारचालक म्हणून काम करतो. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. श्रद्धा घरात नीट काम करत नाही, व्यवस्थित बोलत नाही म्हणून त्यांच्यात वादावादी व्हायची. त्यामुळे काही दिवस श्रद्धा माहेरीही गेली होती.
सोमवारी रात्री वसंत हा सासऱ्यांकडे शंकरशेठ रस्त्यावरील घरी गेला. त्या ठिकाणी भांडण करत श्रद्धाला घेऊन आला. लष्कर भागात त्यांच्यात वादावादी झाली. चिडलेल्या वसंत याने श्रद्धाच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. त्यामुळे ती जागीच कोसळली. मग वसंतने पळ काढला. तो मंडई येथील संकल्प बारमध्ये दारू प्यायला गेला. तिथे त्याने नशेत आपल्या मित्राला पत्नीचा खून केल्याचे सांगितले. याची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरेश बलसाने यांना मिळाली. त्यानुसार फौजदार गीता बागवडे, पोलीस कर्मचारी बलसाने, सुनील पवार, नातू, रमेश गरुड यांनी जाऊन वसंत याला अटक केली.
दरम्यान, लष्कर भागात एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ती श्रद्धा होती. पोलिसांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वसंत दीक्षित याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडी सुनावली.