पीएमपीच्या कामगारांना बोनससह सानुग्रह अनुदान Print

रोजंदारीवरील कामगारांनाही बक्षिशी मिळणार
प्रतिनिधी
पीएमपी कामगारांनी केलेली दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदानाची मागणी महापालिकेच्या स्थायी समितीने मान्य केली असून कामगारांना एक पगार आणि सानुग्रह अनुदानापोटी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. पाच हजार सहाशे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. कायम कामगारांबरोबरच रोजंदारीवरील अडीच हजार कामगारांनाही पाच हजार रुपये एवढी दिवाळी बक्षिशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पीएमपी कामगारांनी ८.३३ टक्के बोनससह सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, ते पाच हजार रुपये एवढे द्यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी पीएमपीच्या बोनस व सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेने आठ कोटी ८१ लाख रुपये दिले होते. यंदा १० कोटी ९१ लाख रुपये एवढी रक्कम लागणार आहे. सानुग्रह अनुदान सहा हजार केल्यास साडेअकरा कोटी रुपये लागतील. त्यासंबंधीचा निर्णय बुधवारी आम्ही आयुक्त व मुख्य लेखापालांबरोबर चर्चा करून घेऊ, असे चांदेरे यांनी सांगितले.
पीएमपीच्या नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बक्षिशी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणीदेखील मान्य करण्यात आली असून दोन हजार २०५ कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. या कामगारांना बक्षिशी म्हणून पाच हजार रुपये दिले जातील. त्यासाठी पुणे महापालिका ७५ लाख रुपये, तर पिंपरी महापालिका ५० लाख रुपये एवढा वाटा उचलणार आहे.