गर्दीत घुसमटणारे पादचारी अन् वाहतुकीचा विचका! Print

टीम लोकसत्ता - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
सुई-दोरा, कपडे, चपलांपासून खाद्य पदार्थापर्यंतच्या सर्व वस्तू विकायला ठेवलेले रस्त्यावरचे ‘सुपर मार्केट’ आणि रस्त्यांच्या कडेकडेने गर्दीतून वाट काढत खरेदी करणारे पुणेकर हे दृश्य बघायचे असेल, तर लक्ष्मी रस्ता गाठा.. मात्र पाच मिनिटांत पार करण्याजोग्या अंतरासाठी गर्दीतून धक्काबुक्की करीत किमान अर्धा तास चालण्याची तयारी हवी!
रस्त्यावरच्या या सुपर मार्केटमध्ये टॉवेल, बेडशीट, उशांचे अभ्रे, हातमोजे-पायमोजे, हातरुमाल, रांगोळीचे रंग, स्टिकर्स, चपला, आहेराची पाकिटे, मोबाइल कव्हर, की-चेन, दागिने, पणत्या, सेंट-स्प्रे, सीडी-डीव्हीडी, फुगे, भेळ, पॉपकॉर्न, बॉबी, तिखट-मीठ लावलेले आवळे.. अशा अगणित वस्तू तुम्हाला मिळतील. विशेष म्हणजे हे मार्केट केवळ रस्त्यावरच नाही तर रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बॅरिकेड्सवरही विस्तारले आहे.. अर्थातच पादचाऱ्यांना चालताना जीव मुठीत घ्यायला लावणारे आणि आधीच कासवगतीने चालणाऱ्या वाहतुकीचा पूर्णपणे विचका करणारे!
शनिवारी व रविवारी ऐन गर्दीच्या वेळेत ‘टीम लोकसत्ता’ने लक्ष्मी रस्ता व आसपासच्या चौकांची पाहणी केली. त्यात दिसलेले हे जसेच्या तसे चित्र..
गणपती चौक, सायं. ६:३०
बॅरिकेड्सच्या आत फुटपाथला लागून सायकली लावलेल्या होत्या. एक विक्रेता स्टुलावर उभा राहून आरडाओरडा करीत ग्राहकांना आकर्षित करत होता. ही तुळशीबागेची मागची बाजू असल्याने तयार कपडे, चपला यांचे ढीग आणि दागिन्यांची छोटी दुकाने या भागात पसरली होती. फुटपाथच्या कठडय़ांवरही कपडे विकायला ठेवलेले होते. साहजिकच तुळशीबागेतील तुडुंब गर्दीचा लोंढा रस्त्यावर येऊन पसरला होता. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना फुटपाथवरून चालण्यासाठी रस्ता ओलांडून पलिकडच्या फुटपाथवर चालण्यासाठी जागा शोधावी लागत होती.
शनिपार चौक, सायं. ६.३० ते ८- विश्रामबाग वाडय़ाच्या बाहेर वॉकिंग प्लाझाच्या बॅरिकेड्सना कपडे लटकविले होते. खरेदी करणारे रस्त्यावरच उभे असल्याने वाहनचालक पादचाऱ्यांवर बाजूला होण्यासाठी खेकसत होते. चितळे दुकानाच्या बाहेरील फुटपाथवर फळे, चपला, कपडे, रांगोळीचे छाप अशा पथाऱ्या पसरल्या होत्या. भाजीवाले बॅरिकेड्सच्याही बाहेर बसले होते. चितळे दुकानापासून बिझिलँड बिल्डिंग चौकापर्यंत जाणारा रस्ता तुलनेने छोटा आहे. त्यात पथारीवाले रस्त्यावर येऊन बसल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती.  
शर्मिली दुकान ते विश्रामबाग वाडा चौक, सायं. ६.०० ते ७.३०
या रस्त्यावर दुचाकी पार्किंगच्या बाजूला विक्रेते अधिक होते. प्रचंड गर्दीमुळे पीएमटी गाडय़ांना विश्रामबाग वाडा चौकात वळण घेताना नाकीनऊ येत होते. या रस्त्यावर पथारीवाल्यांकडून खरेदी करणारे घासाघीस करण्यात मग्न होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना आणखी त्रास होत होता. वाहतुकीची तर पुरती वाट लागली होती.
कुंटे चौक (कजरी दुकान, लक्ष्मी रस्ता), सायं. ६.००
रस्त्याच्या एकाच बाजूला गाडी लावायची परवानगी असल्यामुळे ती जागा कधीच भरली होती. रस्त्याच्या डाव्या बाजूला नो पार्किंगच्या भागात चारचाकी गाडय़ा लावलेल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. फुटपाथवर तसेच रस्त्याच्या बाहेरील बाजूसही रांगोळी, पिशव्या आणि पाकिटे विकणारे बसले होते. रस्त्यावर उतरावे तर नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने आणि फुटपाथवरून चालावे तर पथाऱ्या अशा परिस्थितीमुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरूनच एखाद्या रांगेत उभे राहिल्याप्रमाणे हळूहळू पुढे सरकणे भाग होते. कजरी चौकातून शेजारच्या चौकात चालत पोहोचण्यासाठी तब्बल पंधरा मिनिटे लागली. या भागात लोकांनी खरेदीसाठी तुडुंब गर्दी केली होती. लक्ष्मी रस्त्यावरील वॉकिंग प्लाझाचा आणि पदपथाचा वापर पथाऱ्या टाकून दुकाने लावण्यासाठीच झाल्याने तिथून चालणे अशक्य झाले होते. खरेदी करणारे लोक या जागेत घोळक्याने उभे राहत होते. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडत होते. परिणामी वाहतूक कोंडीत भरच पडत होती.

..पाठ  वळली की
‘जैसे थे’
पथाऱ्यांमुळे होणाऱ्या वाहतुककोंडीविषयी काही वाहतूक पोलिसांशी संवाद साधला असता, त्यांची प्रतिक्रिया होती, ‘रस्त्यावर ठाण मांडलेल्या विक्रेत्यांना उठवण्याची जबाबदारी आमची नसून ती महानगरपालिकेची आहे. मात्र ही अतिक्रमणे वाहतुकीच्या कोंडीला जबाबदार ठरतात. अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई केली की हे विक्रेते शे-दोनशे रुपये देऊन किंवा प्रसंगी दंड भरून सुटका करून घेतात आणि अतिक्रमण विभागाच्या गाडीची पाठ वळली की परिस्थिती ‘जैसे थे’ होते.’

* पादचाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून वर्षांपूर्वी लक्ष्मी रस्त्यावर खास ‘वॉकिंग प्लाझा’ करण्यात आला. त्यानुसार एकाच बाजूला पार्किंग, पदपथ अतिक्रमणमुक्त करून वाहतूक सुरळित करण्याचे स्वप्न रंगवण्यात आले. सुरुवातीला त्याचा गवगवा झाला. पण नव्याचे नऊ दिवस संपले अन् या रस्त्याची गत झाली ‘पहिला पाढे पंचावन्न’!.. विशेषत: दिवाळीसाठी लोक मोठय़ा संख्येने बाहेर पडत असताना लक्ष्मी रस्ता व परिसराचे कसे बारा वाजले आहेत, हे दिसत आहे. त्यामुळे सर्वाधिक कुचंबणा होते आहे पादचाऱ्यांची, कारण इथे पदपथांवर अन् वॉकिंग प्लाझाच्या आधाराने पथाऱ्या पसरल्या आहेत! इथल्या वाहतुकीचे हाल तर कुत्रे खात नाही..