पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपी न्यायालयातून पसार Print

प्रतिनिधी
पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहाराच्या गुन्ह्य़ात आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याने न्यायालयाच्या दारातून धूम ठोकली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या सुरक्षिततेसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस असताना देखील हा प्रकार घडल्यामुळे येथील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खलील ऊर्फ लायक साहेबलाल नदाफ (वय ४५, रा. आळंद, कर्नाटक) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पौंड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अरविंद पांडुरंग लाळे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहाराच्या गुन्ह्य़ात नदाफ याला पौड पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी न्यायालयात गर्दी असल्यामुळे कामकाज संपायला उशीर झाला होता. नदाफ याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. न्यायालयात हजर केल्यामुळे त्याच्या बेडय़ा काढण्यात आल्या होत्या. लाळे हे इतर न्यायालयीन कामकाज उरकत असताना गर्दीचा फायदा घेऊन नदाफ याने न्यायालयातून पळ काढला. त्याचा शोध पौड पोलीस करत आहेत. त्याच बरोबर शिवाजीनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.