नाबार्डतर्फे स्वयंसहायता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन Print

प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेतर्फे (नाबार्ड) राज्याच्या विविध भागातील स्वयंसाहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
राज्यातील स्वयंसाहायता गटांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी. हस्तकलेच्या या वस्तू लोकांपर्यंत पोचाव्या या उद्देशाने नाबार्डतर्फे या वस्तूंचे दरवर्षी प्रदर्शन आयोजित केले जाते. शिवाजीनगर येथील नाबार्ड कार्यालयाच्या आवारात रविवापर्यंत (११ नोव्हेंबर) हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नाबार्डचे चीफ जनरल मॅनेजर एम. व्ही. अशोक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनामध्ये हातमागावरील पैठणी, कुर्ते, पर्स, ज्यूटपासून तयार केलेल्या विविध वस्तू, कॉटनच्या साडय़ा, वारली पेंटिंग केलेल्या विविध वस्तू, फ्रेम्स, आकाश कंदील, पणत्या, उटणे अशा खास दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, विविध मूर्ती, विविध प्रदेशांमधील खासीयत असलेले खाद्यपदार्थ, मध, औषधी वनस्पतींपासून तयार केलेले पदार्थ यांसारख्या अनेक वस्तू आहेत.