विमान तिकीट फसवणूक प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Print

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
प्रतिनिधी
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची विमानाच्या तिकीट बुकिंगमध्ये फसवणूक प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून या विद्यार्थ्यांना भारतात येण्यासाठी तिकिटांची व्यवस्था करावी, अशी माहिती क्रिएटीव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
चंदीगड येथील इंडोकॅनेडीयन कंपनीकडून अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या १६६ विद्यार्थ्यांची कोटय़वधीची फसवणूक झाल्याची तक्रार कर्वेनगर येथे राहणारे विद्यार्थ्यांचे पालक प्रकाश रामकृष्ण राळेरासकर यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे केली होती. याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कोथरुड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप नौकुडकर हे करत आहेत.
याबाबत खर्डेकर यांनी सांगितले की, याप्रकरणात विद्यार्थ्यांना भारतात येण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. यासाठी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधणार आहे. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची गुरुवारी भेट घेणार आहेत.