आयुक्तांकडून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन- मनसे Print

प्रतिनिधी
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याच्या प्रकरणात ‘संबंधितांवर तुम्ही काय कारवाई केली याचे प्रतिज्ञापत्र सादर करा’, असा आदेश उच्च न्यायालयाने आयुक्तांना दिला आहे. या आदेशाबाबत तसेच निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या कारवाईच्या आदेशाबाबत आता आयुक्तांनी ठोस कृती केली नाही, तर आयुक्तांच्या विरोधातच आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.महापालिकेतील विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांनी हा इशारा बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. पक्षाचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक राजू पवार, नीलम कुलकर्णी तसेच समाधान शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांच्याकडे मिळकत कराची थकबाकी असतानाही त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. तसेच ही रक्कम मुदतीत भरली होती, असे दाखवण्यासाठी आमदार अनिल भोसले यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला, अशा लेखी तक्रारी मनसेचे समाधान शिंदे यांनी केल्या होत्या, असे मोरे यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी देखील झाली आहे. संबंधित ठेकेदार कंपनी, तसेच कंपनीचे तीन कर्मचारी आणि महापालिकेचे दोन अधिकारी या प्रकरणात दोषी आढळले आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ही चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना आमदार भोसले यांनी धमकावले अशी तक्रार आहे. तसे लेखी तक्रार पत्र झुरमुरे यांनी आयुक्तांना दिले होते, असेही मोरे यांनी सांगितले.
या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्यामुळे अखेर शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच संगणकीकृत दस्तऐवजांमध्ये झालेल्या फेरफारीच्या प्रकरणात संबंधितांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र, त्याबाबतही अद्याप कारवाई झालेली नाही, असेही मोरे म्हणाले.