रक्तपिशव्यांच्या प्रस्तावित दरवाढीला ग्राहक पंचायतीचा विरोध Print

प्रतिनिधी
रक्तपेढय़ांच्या राष्ट्रीय संघटनेकडून (आयएसबीटीआय) प्रस्तावित असलेल्या रक्तपिशव्यांच्या दरवाढीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने विरोध दर्शविला आहे. या दरवाढीला राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेची मंजुरी मिळालेली नसतानाही काही पेढय़ांनी रक्तपिशवीचा दर ८५० रुपयांवरून १३५० रुपयांवर नेला आहे, ही बाब बेकायदेशीर आहे, असा आरोप ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांना पत्रकार परिषदेत केला.
आयएसबीटीआयच्या रक्तपिशव्यांची प्रस्तावित दरवाढ योग्य नाही. पुण्यातील गरवारेसारख्या काही खासगी रक्तपेढय़ा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रक्तपिशवीसाठी ६०० रुपये आकारतात. त्यामुळे सध्याचा पिशवीचा ८५० रुपये हा दर रक्तपेढय़ांना परवडणारा आहे. प्रस्तावित दरवाढ प्रत्यक्षात येण्यापूर्वीच काही रक्तपेढय़ांनी रक्तपिशवीला १३५० रुपये आकारणे सुरू केले आहे. रक्तपिशवीची अधिकृत किंमत ६०० रुपये ठेवावी, मान्य दरापेक्षा अधिक दर लावणाऱ्या रक्तपेढय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी तसेच रक्तदात्यांनी ६०० रुपयांस रक्तपिशवी देणाऱ्या रक्तपेढय़ांनाच रक्तदान करावे, अशा मागण्याही टाकळकर यांनी यावेळी केल्या.