महापालिकेच्या क्रीडा समितीचा निर्णय Print

सणस मैदान यापुढे फक्त अ‍ॅथलेटिक्ससाठीच देणार
प्रतिनिधी
महापालिकेचे सणस मैदान यापुढे फक्त अ‍ॅथलेटिक्सचा सराव व त्याच क्रीडा प्रकारातील स्पर्धासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. विविध प्रशिक्षण शिबिरांसह इतर अनेक कार्यक्रमांसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले जात होते. यापुढे मात्र मैदान फक्त अ‍ॅथलेटिक्ससाठीच दिले जाईल.
क्रीडा समितीचे अध्यक्ष, नगरसेवक अविनाश बागवे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. क्रीडा समितीची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीत सणस मैदानाच्या वापराबाबत चर्चा झाली. हे मैदान अन्य अनेक कार्यक्रमांना, विशेषत: प्रशिक्षण शिबिरांना उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे तसेच इतर अनेक कारणांसाठी या मैदानाचा वापर होत असल्यामुळे अ‍ॅथलेटिक्स प्रकारांचा सराव करणाऱ्या खेळाडूंच्या सरावात सतत व्यत्यय येतो. अनेकवेळा खेळाडूंना सराव करणेही अवघड होते. त्याबाबत क्रीडा प्रशिक्षकांकडूनही तक्रारी येत होत्या. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन क्रीडा समितीने हा निर्णय घेतल्याचे बागवे यांनी सांगितले.
क्रीडा समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सणस मैदानावर यापुढे फक्त अ‍ॅथलेटिक्सचाच सराव करता येईल तसेच तेथे फक्त त्याच खेळांच्या स्पर्धा होतील. अन्य कारणांसाठी या मैदानाचा वापर करता येणार नाही.
‘महापौर चषक’ साठी बैठक
शहरात विविध भागांमध्ये नगरसेवकांकडून महापौर चषक स्पर्धाचे आयोजन केले जाते. वर्षभर या स्पर्धा सुरू असतात. त्याऐवजी वर्षांतून एकदाच महापौर चषकाच्या स्पर्धा घ्याव्यात असा धोरणात्मक निर्णय क्रीडा समितीने घेतला असून या स्पर्धाबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. महापौर चषक स्पर्धाच्या आयोजनासाठी पुढील महिन्यात शहरातील सर्व क्रीडा संघटकांची बैठक घेतली जाणार असून या बैठकीनंतर महापौर चषक स्पर्धाच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बागवे यांनी सांगितले.