बिबवेवाडीत शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिकेचा आत्महत्येचा प्रयत्न Print

प्रतिनिधी
बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली असून, मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली, तरी संबंधित मुख्याध्यापिकेने अद्याप याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही.
संबंधित मुख्याध्यापिका गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी शाळेच्या परिसरातच विषारी औषध प्राशन केले. या प्रकारामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. हा प्रकार शाळेतील त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याध्यापिकेला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. मात्र, अद्याप संबंधित मुख्याध्यापिकेने या प्रकराबाबत किंवा त्याच्या कारणाबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. दरम्यान, शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ व मुख्याध्यापिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.