‘आमचे उपजीविकेचे साधन हिरावू नका’ Print

पथारीवाल्यांची बाजू
प्रतिनिधी
‘‘फुटपाथ आणि वॉकिंग प्लाझामध्ये पथाऱ्या पसरल्याने वाहतूक व्यवस्थापनात जे प्रश्न निर्माण होतात, त्याबाबत सहकार्यास आम्ही तयार आहोत. महापालिकेने आम्हाला व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी, त्याचे भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत. पण आमच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नका!’’ अशी प्रतिक्रिया पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली.
लक्ष्मी रस्ता आणि आसपासच्या भागांत पथारीवाल्यांच्या आक्रमणांमुळे होणारी पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा आणि वाहतुकीची कोंडी याबाबत ‘टीम लोकसत्ता’ ने पाहणी करून काही निरिक्षणे नोंदविली होती. याबाबत मोरे यांनी पथारीवाल्यांची बाजू मांडली. मोरे म्हणाले, ‘‘गेली दहा वर्षे पथारीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. केंद्र सरकारने पथारीवाल्यांच्या रोजगार हक्काबाबतचा कायदा लवकरात लवकर आणायला हवा. पथारीवाल्यांना व्यवसाय करण्यास दुसरी जागा देण्यासाठी आम्ही मनपाला विविध पर्याय दिले आहेत. नदीकाठच्या रस्त्यांवर अथवा स्वारगेटजवळील कॅनालजवळ रस्ता करून तिथे पथारीवाल्यांसाठी जागेची व्यवस्था करता येईल. पर्यायी जागादेखील आम्हाला फुकट नको. त्यासाठीचे भाडे मनपाला देण्यास आम्ही तयार आहोत. वाहतूक व्यवस्थापनाचा विचका होण्यास केवळ पथारीवाले जबाबदार नाहीत. बेशिस्त वाहनचालकही यासाठी तितकेच जबाबदार आहेत.’’    
पथारीवाल्यांसाठी ‘जाणीव’चे मॉडेल
‘जाणीव’ संघटनेचे विलास चापेकर यांनी सांगितले की, ‘‘पथारीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सिंहगड रस्ता आणि नगर रस्ता येथे मार्केट बांधून तयार आहेत. केंद्र सरकारकडे रोजगार हक्क कायद्याविषयीचे विधेयकही तयार असून ते येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. हा कायदा मंजूर झाल्यावर या मार्केटच्या हस्तांतरणाबाबत निर्णय घेतला जाऊ शकेल. यासाठी त्या-त्या भागांतील पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणे गरजेचे असतानाही कामाची गती अतिशय संथ आहे. काही रस्ते केवळ फेरीवाल्यांसाठी असावेत, शक्य असेल तिथे मोठे फुटपाथ बांधावेत, आहेत त्या फुटपाथवर निम्म्या भागात पथारीवाल्यांनी व्यवसाय करावा व निम्मी जागा चालणाऱ्यांसाठी मोकळी ठेवावी अशी काही मॉडेल्स ‘जाणीव’ ने मनपापुढे मांडली आहेत. हा विषय गेली ५-६ वर्षे लावून धरूनही त्याबाबत योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.’’