कात्रज बोगद्यात ट्रकला आग |
![]() |
दीड तास वाहतूक ठप्प प्रतिनिधी कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागण्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. आग विझवून ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली. मुंबईतील गजानन रोडलाईन्स कंपनीचा हा ट्रक (क्र. एमएच ०४ बीजी १६) मुंबईहून विविध वस्तू घेऊन आला होता. नव्या बोगद्याच्या अगदी मध्यभागी आल्यानंतर इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ट्रक थांबवून बाजूला घेतला. खाली उतरल्यानंतर इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यामुळे चालकाने तातडीने पोलिसांनी दूरध्वनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशामक दलाला याबाबत कळविले. काही वेळातच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी ट्रकच्या इंजिनने पेट घेतला होता. त्याचप्रमाणे ट्रकमध्ये ठेवलेल्या साहित्यापर्यंतही आग पोहोचली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळेतच आग आटोक्यात आणून पूर्णपणे विझविली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आला. ही आग बोगद्यात लागल्याने संपूर्ण बोगदा धुराने भरून गेला होता. प्रचंड धुरामुळे बोगद्यात जाणेही कठीण झाले होते. ट्रकला आग लागल्यापासूनच या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मालवाहू गाडय़ांबरोबरच, मोटारी व एसटी व खासगी बसगाडय़ांमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास ट्रक बोगद्याच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी लावण्यात आला. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली. |