बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्य क्षेत्राला प्राधान्य Print

प्रतिनिधी
‘‘बारावी पंचवार्षिक योजना ही आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणारी असून कुपोषण, महिलांचे प्रश्न, बालकांच्या आरोग्याचे प्रश्न या मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. या पंचवार्षिक योजनेनुसार राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी २.५ टक्के उत्पन्न हे आरोग्य क्षेत्रावर खर्च करण्यात येणार आहे,’’ असे नियोजन आयोगाच्या सदस्य डॉ. सय्यदा हमीद यांनी शुक्रवारी सांगितले.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या उद्घाटन समारंभात डॉ. हमीद बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अनू आगा, कर्वे समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष अजय भावे, कार्याध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, संचालक डॉ. दीपक वलोकर हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. हमीद म्हणाल्या, ‘‘सन  २०१२ ते १७ या कालावधीमध्ये अमलात येणारी बारावी पंचवार्षिक योजना ही देशातील आरोग्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारी आहे. त्याचबरोबर कुपोषण, महिलांचे प्रश्न, बालकांच्या आरोग्याचे प्रश्न अशा विविध मुद्दय़ांवर या योजनेमध्ये भर देण्यात आला आहे. योजनांअंतर्गत धोरणे ठरवली जातात. मात्र, ती धोरणे आणि त्यानुसार राबवल्या जाणाऱ्या योजना गरजूंपर्यंत पोहोचतात का? याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपल्याकडे सामाजिक दरी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. ती दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ यावेळी डॉ. अनू आगा म्हणाल्या, ‘‘शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, तरीही अजून किमान तीन टक्के मुले शाळेत जात नाहीत. पण या सगळ्यापेक्षा देशातील शिक्षण क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, ते शिक्षणाच्या दर्जाचे. देशातील शिक्षणाचा दर्जा अत्यंत वाईट असून तो सुधारण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे.’’
यावेळी सामाजिक कार्यातील अनेक नामवंत व्यक्ती, संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.