साखर आयुक्तांची मोटार जळाली Print

आगीबाबत आयुक्तांना संशय
प्रतिनिधी
साखर आयुक्त विजय सिंघल यांची शिवाजीनगर येथील मोटार पहाटेच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याबाबत पोलिसांनी ही मोटार शॉटसर्कीटमुळे जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, साखरआयुक्त सिंघल यांनी ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचे दिसत नसल्याचे म्हणत याबाबत संशय व्यक्त केला आहे.
शिवाजीनगर साखर संकुल परिसरात सिंघल यांचा बंगला आहे. या बंगल्यासमोर त्यांची होंडा सिटी मोटार उभी केली होती. बंगल्याच्या संरक्षणासाठी एक सुरक्षारक्षक आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही मोटार पेटल्याचे दिसून आले. तत्काळ सुरक्षारक्षकाने साखर आयुक्तांना घटनेची माहिती देत ही आग विझली. या आगीमध्ये मोटार पूर्णपणे जळून गेली असून याबाबत शिवाजीगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले.
साखरआयुक्त सिंघल म्हणाले, ‘झोपेत असताना पहाटे सुरक्षारक्षकाने मोटारीला आग लागल्याचे सांगितले. आम्ही लवकर आग विझवल्याने पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला नाही. त्यांना ही मोटार कोणी पेटवली असे वाटते का, असे विचारले असता, त्यांनी याबाबत काही सांगू शकत नाही. मात्र, मला ही आग शॉटसर्कीटमुळे लागली, असे वाटत नाही. कारण ती मागच्या बाजूला लागली होती. मोटारीचे इंजिन पुढच्या बाजूला आहे.’