स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट धान्याचे वितरण Print

पालकमंत्र्यांना ‘घरचा आहेर’
नागपूर /  प्रतिनिधी
सण आणि उत्सवांच्या काळात स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण होत असल्याचे उघडकीस आले असून याबाबत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण तातडीने थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले.   सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन श्रीवास यांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित झालेला निकृष्ट दर्जाचा गहू प्राप्त झाला. याची माहिती त्यांनी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे सचिव ब्रजभूषण शुक्ला यांना दिली. त्यांनी निकृष्ट गव्हाचे नमुने नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांना दिले. स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण होत असल्याची तक्रार नागरिक गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काँग्रेसच्या शहर कार्यालयात करीत आहेत. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी जयप्रकाश गुप्ता यांनी केली आहे.  याबाबत तक्रार प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे यापुढे वितरण होऊ नये आणि सामान्यांना चांगल्या धान्याचे वितरण व्हावे, अशी मागणी जयप्रकाश गुप्ता यांनी पालकमंत्री मोघे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.