सेटअप बॉक्समुळे केबल बंद पडण्याच्या अफवा Print

नागपूर / प्रतिनिधी
सेटअप बॉक्समुळे केबल टीव्ही बंद पडणार असल्याची अफवा डीटीएच कंपन्यांद्वारे पसरवली जात असून या अफवा निव्वळ केबल टीव्ही बंद पाडण्यासाठी पसरवल्या जात असल्याचा निर्वाळा नागपूर जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनने दिला आहे.
केंद्र शासनाच्या दूरसंचार मंत्रालयाद्वारे कंडिश्नल अ‍ॅड्रेसेबल सिस्टिम कायद्यांतर्गत भारतात तीन टप्प्यात सेटअप बॉक्स लावण्याची मुभा दिली आहे. प्रथम टप्प्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये ३१ ऑक्टोबपर्यंत सेटअप बॉक्स लावणे अनिवार्य आहे. दुसरा टप्पा १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकूण ३८ शहारात ३१ मार्च २०१३पर्यंत लागू करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर जिल्हा आहे. तिसऱ्या टप्प्यात ३० सप्टेंबपर्यंत राबवला जाणार आहे. केंद्र शासनाच्या या नवीन धोरणानुसार डिजिटल केबल टीव्हीमध्ये कमितकमी ५०० चॅनल दिसणार आहेत. त्यात १०० चॅनल्स १०० रुपयांत आणि स्थानिक करांमध्ये मिळणार. त्यात राष्ट्रीय व दूरदर्शनचे चॅनलही राहील. त्यानंतर अतिरिक्त चॅनल्ससाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, लोकांमध्ये डीटीएच कंपन्यांद्वारे संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. सेट अप बॉक्सद्वारे केबल टीव्ही बंद पडणार अशा अफवा पसरवल्या जात असून केबल सोबतच सेट अप बॉक्स लावण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष बांते यांनी केबल आणि डीटीएचमधील फरक स्पष्ट करीत केबलचे विविध फायदे सांगितले.  डिजिटर अ‍ॅक्सेस सिस्टिम(डीएएस) करण्याचे मुख्य कारण म्हणजे चॅनलची संख्या ८५०च्या घरात असून सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत एवढय़ा चॅनल्सला एकत्र दाखवणे शक्य नाही. त्यामुळेच केंद्र शासनाने डासच्या कायद्याची निर्मिती केली चॅनल्सच्या उत्कृष्ट प्रसारणासाठी केबलधारकच उत्तम सेवा देऊ शकतात, असेही बांते म्हणाले. यावेळी मनोज ठक्कर, योगेश देशमुख आणि हरविंदरसिंग उपस्थित होते.