औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधात ‘व्हीआयए’चा गुरुवारी ‘उद्योग बंद’ Print

नागपूर / प्रतिनिधी
महावितरणने औद्योगिक वीज दरात ४० टक्के वाढ केल्याच्या विरोधात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने २५ ऑक्टोबरला विदर्भात ‘उद्योग बंद’चे आवाहन केले आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात गुरुवारी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ विदर्भ अंतर्गत औद्योगिक संघटनांची बैठक झाली. वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर महावितरणने औद्योगिक वीज दरात ४० टक्के वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
विदर्भातील उद्योग अडचणीत असताना ही दरवाढ लादणे म्हणजे येथील उद्योगांना दुसऱ्या राज्यात स्थानांतरित होण्यास प्रवृत्त करण्यासारखे आहे, असे मत बैठकीत ‘व्हीआयए’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. वीज दरवाढीचा हा निर्णय एकतर्फी आहे. या निर्णयाच्या विरोधात २५ऑक्टोबरला विदर्भातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा आणि यानंतरही शासनाच्या निर्णयात बदल न झाल्यास उद्योगांनी वीज बिल न भरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शेजारील राज्यांच्या वीज दराच्या प्रमाणात विजेचे दर ठेवावे, वीज नियामक आयोगाने समांतर वीज खरेदी परवाने द्यावे, शासनाच्या महसुलात होत असलेली घट लक्षात घेता राज्यातील अद्योगांसाठी अनुदान द्यावे, आदी मागण्यांसह  विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
महावितरणने ही वीज दरवाढ करण्यापूर्वी ५०,७५० कोटींच्या दरवाढीचा प्रस्ताव दिला होता, पण नियामक आयोगाने ४८,९२६ कोटींच्या दरवाढीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे ४० टक्के दरवाढ होणार आहे. २००९-१० साली सहावेळा, २०१०-११ साली सातवेळा वीज दरवाढ करण्यात आली. बहुतांश दरवाढ जनसुनावणी न करता करण्यात आली आहे. दरवाढीमुळे उद्योगांना उत्पादन मूल्यांची मोजदाद करणे कठीण झाले आहे. सप्टेबरमध्ये विजेचे दर ८ रुपये ५ पैसे प्रतियुनिट आहेत. शेजारी छत्तीसगड राज्यात हे दर ४ रुपये ७० पैसे आहेत. बैठकीला ‘व्हाआयए॰चे अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, आर.बी. गोयनका, प्रताप होगाडे, अमरावती औद्योगिक संघटनेचे किरण पातुरकर, आशिष चंद्राणा, कमलेश व्होरा, बुटीबोरीचे हेमंत अंबासेलकर, पुनीत महाजन, एस.एस. खंडारिया, नीलेश सूचक, अल्ताफ डबावाला, लियाकर अली यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.